नवी दिल्ली Parliament Attack : बुधवारी (१३ डिसेंबर) संसद परिसराच्या सुरक्षेतील ढिसाळ कारभार समोर आला. दोन तरुणांनी लोकसभेत घुसून गोंधळ घातला. तर दोघं जण संसदेबाहेर घोषणाबाजी करताना दिसले. या चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
राहुल गांधी सभागृहातच उपस्थित होते : लोकसभेत जेव्हा हे घडलं, त्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सभागृहातच उपस्थित होते. आता या सर्व प्रकारावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असून बेरोजगारी आणि महागाई हे त्यामागील कारण असल्याचं ते म्हणाले. शनिवारी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत विचारलं असता राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं.
काय म्हणाले राहुल गांधी : राहुल गांधी म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेत त्रुटी होती. पण असं का झालं? यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बेरोजगारी. या मुद्यावरून संपूर्ण देशात राग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारतातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच, राहुल गांधी म्हणाले की सुरक्षेमध्ये नक्कीच त्रुटी आहे, परंतु त्यामागील कारण बेरोजगारी आणि महागाई हे आहेत.
काय घडलं होतं : गेल्या बुधवारी २००१ च्या संसद हल्ल्याचा वर्धापनदिन होता. यावेळी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि पिवळ्या रंगाचा स्मोक बॉम्ब फोडला. या घटनेनंतर उपस्थित खासदारांनी लगेचच या दोघांना पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं. यावेळी संसदेबाहेरही गोंधळ झाला. तेथे स्मोक बॉम्ब फोडून घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. यापैकी एक महिला होती. लोकसभेत उडी मारलेल्या दोघांची नावं सागर शर्मा आणि मनोरंजन असून, सागर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे, तर मनोरंजन कर्नाटकचा आहे. संसदेबाहेरून अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी, नीलम (४२) ही हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवासी असून, अमोल शिंदे (२५) हा लातूर जिल्ह्यातील आहे.
हे वाचलंत का :
- अमोलच्या आईला हुंदका आवरेना म्हणाल्या, "भरतीसाठी गावोगावी भटकत होता, देशसेवा करायची होती", ETV Bharat शी Exclusive बातचित
- शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्याकडून ऐका संसदेत पिवळा धूर सोडण्याच्या घटनेची पूर्ण कहाणी
- संसदेत जाण्यापूर्वी पार करावे लागतात सुरक्षेचे चार स्तर, जाणून घ्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था