महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सरकारनं तरुणांची मेहनत वाया घालवली', अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - पंतप्रधान मोदी

Rahul Gandhi on Agnipath Scheme : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अग्निपथ योजनेवर प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी बिहारमधील चंपारण येथून पायी दिल्लीत पोहोचलेल्या आणि भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळं फटका बसलेल्या तरुणांची भेट घेतली.

राहुल गांधी
राहुल गांधी

By PTI

Published : Dec 27, 2023, 8:10 AM IST

नवी दिल्ली Rahul Gandhi on Agnipath Scheme : अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 'अग्निपथ' योजनेच्या नावाखाली सरकारनं 2019-21 या कालावधीत सैन्यदल आणि हवाई दलात कायमस्वरुपी भरतीची प्रक्रिया रद्द करुन असंख्य तरुणांची मेहनत वाया घालवली, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी यांनी मंगळवारी केलाय.

काय म्हणाले राहूल गांधी : बिहारमधील चंपारण येथून पायी दिल्लीत पोहोचलेल्या आणि भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या तरुणांची त्यांनी भेट घेतली. यानंतर X (पुर्वीचं ट्विटर) वर या तरुणांना भेटतानाचा फोटो शेअर करताना राहुल गांधींनी एक पोस्ट केलीय. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "तात्पुरत्या भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेच्या (अग्निपथ) नावाखाली, सैन्यदल आणि हवाई दलाची कायमची भरती प्रक्रिया, जी 2019-21 पर्यंत चालली, ती रद्द करण्यात आलीय. सरकारनं असंख्य मेहनती आणि स्वप्नाळू तरुणांची मेहनत वाया घालवली आहे."

रस्त्यांपासून संसदेपर्यंत तरुणांच्या संघर्षात आम्ही एकत्र : राहुल यांनी पुढं लिहिलंय की, "सत्याग्रहाची भूमी असलेल्या चंपारणपासून जवळपास 1100 किलोमीटर पायी चालत तरुण दिल्लीत पोहोचले आहेत. हक्काच्या मागणीसाठी आलेल्या या तरुणांच्या संघर्षाला कोणत्याही मीडियाच्या कॅमेऱ्यात स्थान मिळालं नाही, हे खेदजनक आहे. छोट्या खोल्यांमध्ये राहून मोठी उद्दिष्टे साध्य करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या दुर्दशेला मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या 'प्राइम टाइम'मध्ये स्थान मिळणार नाही. पण आम्ही फक्त 'रोजगाराबद्दल' बोलत आहोत. रस्त्यांपासून संसदेपर्यंतच्या संघर्षात आम्ही तरुणांसोबत आहोत."

माजी सैन्यदलप्रमुखांनी योजनेवर केले होते प्रश्न उपस्थित :माजी सैन्यदलप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी अग्निपथ योजनेबाबत त्यांच्या आत्मचरित्रात दावा केला होता की, या योजनेच्या घोषणेनं तिन्ही सैन्यदलांना (लष्कर, नौदल आणि हवाई दल) आश्चर्यचकित केलं होतं. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत सैन्यदलाचे प्रमुख म्हणून काम पाहिलंय. त्यांनी त्यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकात लिहिलंय की, 2020 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना 'टूर ऑफ ड्यूटी' योजनेचा प्रस्ताव दिला होता. यात अग्निवीरप्रमाणे काही काळासाठी सैनिक भरती करण्याची सूचना करण्यात आली होती, जी केवळ भारतीय सैन्यदलासाठी वैध होती. काही काळानंतर पंतप्रधान कार्यालयानं अग्निपथ योजना आणली. यात सैन्यदलाबरोबरच हवाई दल आणि नौदलाचाही यात समावेश होता. या योजनेनं सैन्यदलापेक्षा हवाई दल आणि नौदलाला अधिक आश्चर्यचकित केल्याचं त्यांनी लिहिलंय.

हेही वाचा :

  1. अग्निपथ योजना सर्वश्रेष्ठ, आर्मी प्रमुख जनरल मनोज पांडे यांचं मत
  2. Soldiers Training : देशाच्या संरक्षणासाठी हजारो अग्निवीर घेत आहेत खडतर प्रशिक्षण, अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details