नवी दिल्ली Rahul Gandhi Remarks On PM Modi : निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात 'पनौती' आणि 'जेबकतरा' यासांरखे शब्द वापरल्याबद्दल राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अशी विधानं अशोभनीय असू शकतात, परंतु अशा कोणत्याही कृतीसाठी ज्यांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत, त्यांना तक्रार दाखल करावी लागेल, असं या सुनावणी दरम्यान न्यायालयानं म्हटलंय.
न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही : हंगामी सरन्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांत या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. वकील भारत नगर यांनी ही याचिका दाखल केलीय. निवडणूक प्रचारसभांमध्ये अशी खोटी आणि विषारी वक्तव्यं थांबवण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक तत्त्वंही ठरवावीत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. जनता अशा विधानांना मतदानाद्वारे प्रतिसाद देते. मग अशी विधानं रोखण्यासाठी कायदा आणणं हे संसदेचं काम असून न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
ज्यांच्या विरोधात विधानं त्यांनाच तक्रार करावी लागेल : सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील आदिश अग्रवाल आणि कीर्ती उप्पल यांनी सांगितलं की, अशा भाषणांविरोधात कठोर कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे. निवडणूक आयोगानं केवळ नोटीस दिली कारण अशा भाषणांवर कारवाई करण्याचा अधिकार आयोगाला नाही. हे विधान पंतप्रधानांबाबत असून पंतप्रधानपद घटनात्मक असल्याचही कीर्ती उप्पल यांनी म्हटलं. तेव्हा हंगामी सरन्यायाधीश म्हणाले की, अशी विधानं अशोभनीय असू शकतात. पण अशी कोणतीही कारवाई करायची असेल तर ज्यांच्या विरोधात अशी विधाने केली आहेत, त्यांना यासंदर्बात तक्रार करावी लागेल.
काय म्हणाले होते राहुल गांधी : राहुल गांधी यांनी 21 नोव्हेंबरला ‘पीएम म्हणजे पनौती मोदी’ असं म्हटलं होतं. मोदी टीव्हीवर येऊन कधी हिंदू-मुस्लिम म्हणतात तर कधी क्रिकेटच्या सामन्यांना जातात. ते पुढं म्हणाले होते की, तुमचं लक्ष इकडं तिकडं वळवणं हे मोदींचं काम आहे, असे दोन पिकपॉकेट आहेत. एक येतो, तुमच्यासमोर तुमच्याशी बोलतो, तुमचं लक्ष विचलित करतो. तोपर्यंत मागून दुसरा कोणीतरी तुमचा खिसा कापतो. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाबाबत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींविरोधात ही टिप्पणी केली होती. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदीही गेले होते. ही सर्व विधानं राहुल गांधी यांनी केलेली आहेत.
हेही वाचा :
- 'पनौती', 'पाकिटमार' प्रकरणी निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
- "आपण अंतिम सामना हारलो कारण तेथे 'पापी लोक' उपस्थित होते", ममता बॅनर्जींचं वादग्रस्त वक्तव्य