नवी दिल्ली -देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला असून स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांसाठी जागा नसल्याचे चित्र आहे. तर यातच कोरोनाच्या संकटात म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नावाच्या रोगाचा प्रसार होत आहे. या सर्व परिस्थतीवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मोदी प्रणालीच्या गैरव्यवस्थेमुळे, कोरोनासोबतच भारतात म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नावाच्या रोगाचा प्रसार झाला आहे. देशात लसींचा तुटवडा तर आहेच. तसेच या नव्या रोगाच्या औषधांचीही प्रचंड कमतरता आहे. आता या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधाना टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा करतीलच, असे खोचट टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी वाराणसीतील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. तेव्हा ते भावूक झाले होते. पंतप्रधान मोदी यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. यातच राहुल गांधींनी 'मगर निर्दोष आहे', असे टि्वट केले. यात त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला नसून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
विदारक परिस्थिती -
देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मात्र, यातच लसीच्या तुडवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर सरकारने कोणतेही लसीकरण धोरण अवलंबले नसल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. तर यातच म्यूकरमायकोसिसचे रूग्ण देशात आढळत आहेत.