हावेरी (कर्नाटक) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आणि देशातील सरकारी नोकऱ्या कमी करत असल्याचा आरोप केला. हावेरी जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गांधी यांनी भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात प्रचार दौरा सुरू आहे. त्यासाठी राहुल गांधी कर्नाटकमध्ये आहेत. येथील जाहीर सभेला संबोधीत करताना त्यांनी हा आरोप केला आहे. सरकारी कंपन्यांचे एक एक करून खासगीकरण केले जात आहे आणि सरकारी नोकऱ्या कमी केल्या जात आहेत. ते म्हणाले, 'नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, बेरोजगारी आज 40 वर्षांतील सर्वोच्च आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.
भाजपला ४० पेक्षा जास्त जागा देऊ नका : आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात सरकारने संस्था उभारायला हव्या होत्या. मात्र, त्याऐवजी त्या सर्वांचे खासगीकरण केले जात आहे. ते म्हणाले, 'आम्हाला असा भारत नको आहे, आम्हाला बेरोजगार भारत नको आहे, आम्हाला गरीब भारत नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे.' निवडणुकीत काँग्रेसला किमान 150 जागा (एकूण 224 पैकी) देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. भाजपला ४० पेक्षा जास्त जागा देऊ नका असही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.