नवी दिल्ली : सुरत येथील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या आडनावाचा सातत्याने अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये देशाची बदनामी करण्याचे काम केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी संसद, ओबीसी समाज आणि न्यायव्यवस्थेची बदनामी करत आहेत.
प्रल्हाद जोशी म्हणाले - जनता धडा शिकवेल : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ते (राहुल गांधी) कोणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत हे काँग्रेसने सांगावे, कारण हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हे तर न्यायालयाने घेतला आहे. जोशी म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ओबीसी समाजाला अपमानित करण्याचे काम त्यांनी (राहुल गांधी) केले आहे. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला असून, जनता त्यांना धडा शिकवेल.
जेपी नड्डा यांचा राहुलवर निशाणा : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधलाय. नड्डा म्हणाले की, त्यांचा (राहुल गांधी) अहंकार खूप मोठा आहे, तर समज खूपच लहान आहे. जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी राजकीय फायद्यासाठी संपूर्ण ओबीसी समाजाला अपमानित करण्याचे काम केले आहे. कोर्टात राहुल गांधी कोर्टाने वारंवार समज देऊनही ते मान्य झाले नाहीत. तसेच माफी मागण्याच्या पर्यायाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
राहुल गांधींवरील खटला:दरम्यान, कालच गुजरातच्या सुरत येथील सत्र न्यायालयाने त्यांना मोदी आडनाव प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालयाने याच प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, शिक्षेची घोषणा झाल्यानंतर न्यायालयाने जामीनही मंजूर केला. मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करतानाच राहुल गांधी 2019 मध्ये कर्नाटकातील एका सभेत म्हणाले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?
हेही वाचा: राहुल गांधी दोषी, काँग्रेस करणार देशभरात आंदोलन