नवी दिल्ली - न्यायालयाने दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावल्यानंतर देशातील अनेक खासदार व आमदारांना आपले सदस्यत्व रद्द गमवावे लागले आहे. राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व शुक्रवारी(24 मार्च) रद्द करण्यात आले आहे. त्याचा आदेशही लोकसभा सचिवालयाने जारी केला आहे. मानहानीच्या प्रकरणात राहुल यांना दोषी ठरवून गुरुवारी सुरत येथील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांच्यावर 'मोदी आडनाव'वर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुजरातचे भाजप आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता व त्यावर आता निकालही समोर आला आहे.
- मोहम्मद फैजल - मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत. त्यांनाही न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.. निवडणूक आयोगाने लक्षद्वीप लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यासाठी अधिसूचनाही जारी केली होती. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद आणि मोहम्मद सालिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरो मोहम्मद यांच्यावर होता.
- खब्बू तिवारी - खब्बू तिवारी यांचे विधानसभेचे सदस्यत्व 2021 मध्ये रद्द करण्यात आले होते. खब्बू हे अयोध्येतील गोसाईगंज मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. खब्बू तिवारी बनावट मार्कशीट प्रकरणात दोषी आढळले होते. त्यांना 18 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- कुलदीप सिंह सेंगर - उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. कुलदीप यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.
- विक्रम सैनी - मुझफ्फरनगरच्या खतौलीचे आमदार असलेले विक्रम सैनी यांनाही आपले सदस्यत्व गमावले लागले होते. विक्रम हे दंगलीत सहभागी असल्याबद्दल दोषी ठरले होते. ही घटना 2013 ची आहे. त्यानंतर मुझफ्फरनगरमध्ये जातीय दंगली झाल्या, त्यावेळी विक्रम सैनी हे जिल्हा पंचायत सदस्य होते आणि त्यांचे नाव दंगलीत आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दंगल प्रकरणी न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
- अब्दुल्ला आझम - सपाचे नेते अब्दुल्ला आझम यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सपाचे सरचिटणीस आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांना १५ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. अब्दुल्ला आझम रामपूरच्या स्वार मतदारसंघातून आमदार होते.
- अनंत कुमार सिंह -अनंत कुमार सिंह यांचे विधानसभेचे सदस्यत्वही रद्द झाले होते. अनंत कुमार हे बिहारचे मोकामाचे आमदार होते. सिंह यांच्या घरातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना पाटणा न्यायालयाने दोषी ठरवले होते.
- अशोक चंदेल - अशोक चंदेल यांनाही एका खून खटल्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर चंदेल यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले होते. चंदेल हे हमीरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
- आझम खान - सपाजे ज्येष्ठ नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांचे सदस्यत्वही रद्द झाले होते. आझम खान सलग 10 वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते खासदारही आहेत. आझम खान यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी तीन वर्षे न्यायालयात खटला चालला आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. दोषी ठरल्यानंतर आझम यांना जामीन मिळाला, मात्र त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले.