अहमदाबाद - गुजरात हायकोर्टात राहुल गांधींच्या मानहानीच्या खटल्याची उद्या म्हणजेच २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी या सुरत न्यायालयाच्या आदेशाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी त्यांची याचिका सुरत सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुजरात हायकोर्टात उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
राहुल गांधी बदनामी प्रकरणाची सुनावणी : सुरतच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रथम गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गीता गोपी यांच्यासमोर आणण्यात आली होती. परंतु गीता गोपी यांनी माझ्यासमोर हा खटला नको असे म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायमूर्ती हेमंत प्रचारक या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. 29 एप्रिल रोजी ही सुनावणी होणार आहे. 23 मार्च रोजी, सुरत न्यायालयाने 2019 मध्ये राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पण्यांबाबत निर्णय दिला होता. न्यायालयाने त्यांना कलम ५०४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली.