महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात - राहुल गांधी

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली. ही यात्रा 15 राज्यांतून 6,713 किलोमीटरचे अंतर कापणार असून 20 मार्च रोजी मुंबईत तिचा समारोप होणार आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 6:20 PM IST

Updated : Jan 14, 2024, 6:26 PM IST

नवी दिल्ली Bharat Jodo Nyaya Yatra : 'भारत जोडो न्याय यात्रे'ला रविवारी मणिपूर येथून सुरुवात झाली. यावेळी यात्रेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. "भारताच्या पंतप्रधानांना आजपर्यंत मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. कदाचित भाजपा आणि आरएसएसच्या दृष्टीनं मणिपूर भारताचा भाग नाही", असा हल्लाबोल त्यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी : "भारत जोडो यात्रे दरम्यान जसा आम्ही दक्षिण-उत्तर पायी प्रवास केला, तसाच पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करावा अशी माझी इच्छा होती. लोकांनी यात्रा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या. काही पूर्वेकडून तर काही पश्चिमेकडून सुरुवात करण्यास सांगत होते. पण मी म्हणालो, पुढची भारत जोडो यात्रा मणिपूरमधूनच सुरू होऊ शकते", असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

मणिपूर भाजपाच्या राजकारणाचं प्रतीक : "मणिपूर हे भाजपाच्या राजकारणाचं प्रतीक आहे. ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाचं, विचारसरणीचं आणि दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. भाजपा आणि आरएसएसचा द्वेष पसरल्यानं मणिपूरनं सर्वस्व गमावलं. मी 2004 पासून राजकारणात आहे. भारतातील अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलो जिथे प्रशासनाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत", असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

बसेसचा वापर करून हायब्रीड ट्रिप : भारत जोडो यात्रेत आम्ही द्वेष नष्ट करण्याबाबत आणि भारताला एकत्र बांधण्याबाबत बोललो आहोत. लोकांनी आम्हाला सांगितलं की, कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केल्यानंतर आम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडेही प्रवास केला पाहिजे. आमच्याकडे वेळ कमी असल्यानं आम्ही बसेसचा वापर करून हायब्रीड ट्रिप करण्याचा निर्णय घेतला, असं राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.

70 काँग्रेस नेते उपस्थित : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात केली. यावेळी सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, रणदीप सिंह सुरजेवाला, अशोक गेहलोत, अभिषेक मनु सिंघवी, भूपेंद्र सिंग हुडा, सचिन पायलट, दिग्विजय सिंग, प्रमोद तिवारी यांच्यासह सुमारे 70 काँग्रेस नेते उपस्थित होते. यात्रेचा रात्रीचा मुक्काम इम्फाळमधील सेकमाई येथील कौजेंगलेमा स्पोर्ट्स असोसिएशन फुटबॉल ग्राउंडवर असेल. यात्रेदरम्यान राहुल गांधी 67 दिवसांत 6,700 किलोमीटरहून अधिक अंतर कापतील. या दरम्यान ते 110 जिल्ह्यांतून प्रवास करतील.

हे वाचलंत का :

  1. राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून मागणार 'न्याय', 15 राज्यांतून 6700 किलोमीटरचा होणार प्रवास
Last Updated : Jan 14, 2024, 6:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details