नवी दिल्ली - आज शेतकरी आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. यावर आज पत्रकार परिषद घेत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच अर्थसंकल्पावरूनही सरकारला लक्ष्य केलं.
केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत किल्लाबंदी का केली जात आहे. सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का, की शेतकरी देशाचे शत्रू आहेत, असा सवाल राहुल गांधींनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्ष कृषी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यासमोर अद्याप कायम आहे, असे मोदी म्हणतात. याचा अर्थ काय होतो. शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. त्यांना घाबरवणं आणि मारणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करणं गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा, असे राहुल गांधी म्हणाले.