नवी दिल्ली : भारतीय तरुणांमध्ये वाढती कट्टरता हे देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान बनले असल्याची कबुली गृह मंत्रालयाने दिली आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सरकारला सादर केलेल्या शोधनिबंधात टॅलेंट स्पॉटिंग केले जाते, असे म्हटले आहे. मदरशांमध्ये, विशेषत: देवबंद, बांदा यांसारख्या ठिकाणी कट्टरपंथी समर्थक अल कायदा विचारसरणीचे विद्यार्थी तयार केले जातात.
बांगलादेशी घुसखोरांसाठी माध्यम बनतात : आसामच्या धुबरी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक (एसपी) अपर्णा एन यांनी एका संशोधन पेपरमध्ये म्हटले आहे की, टॅलेंट स्पॉटिंगच्या कालावधीत ते संभाव्य व्यक्तींना ओळखतात. त्यांना दावत (आमंत्रण) दिले जाते आणि बनावट सिम कार्ड वगैरे तांत्रिक गोष्टींची माहिती दिली जाते. हे विद्यार्थी देशाच्या विविध भागातून आलेले असल्याने ते बांगलादेशी घुसखोरीसाठी एक उपयुक्त आर्थिक आणि रसद माध्यम म्हणून काम करतात.
अल कायदाशी संलग्न संघटना सहभागी : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या डीजीपी आणि आयजीपींच्या बैठकीत 'डीलिंग विथ रॅडिकल ऑर्गनायझेशन्स - द वे फॉरवर्ड' नावाचा शोधनिबंध सादर करण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. अपर्णा एन यांनी सांगितले की, कट्टरतावादाच्या अलीकडील उदाहरणांमध्ये अल कायदाशी संलग्न बंदी घातलेली संघटना अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) आणि देशाच्या विविध भागांमध्ये दिसलेल्या पीएफआय आणि संलग्न संघटनांच्या हालचालींचा समावेश आहे. त्या म्हणाल्या की, एबीटी मॉड्यूलच्या चौकशीदरम्यान हे उघड झाले आहे की विद्यमान शासन प्रणाली उलथून टाकण्यासाठी कट्टरपंथी व्यक्तींचा एक महत्त्वपूर्ण गट तयार करण्याचा हेतू होता. एबीटी सारख्या गटांचे सदस्य कुराण आणि हदीसच्या पवित्र संदर्भांद्वारे कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करतात.