हैदराबाद - गांजासारखा (Ganja) अमली पदार्थ हा युवापिढीचे पर्यायाने देशाचे प्रचंड नुकसान करतो. ही बाब लक्षात घेऊन दक्षतेने काम करणाऱ्या मराठमोळ्या, तेलंगणातील पोलीस आयुक्त महेश भागवत (Mahesh Bhagwat) यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांना गांजाच्या संकटातून अप्रत्यक्षपणे वाचवले आहे. कारण, त्यांनी गेल्या 4 वर्षांत तब्बल 11 हजार किलो गांजा हा दक्षिणेतून महाराष्ट्रात येताना विविध कारवायांमधून जप्त केला आहे.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाच्या विविध भागातून मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात गांजा मोठ्या प्रमाणात पुरवला जात असल्याची माहिती समोर आली. मागील चार ते पाच वर्षात महाराष्ट्रात आंध्र आणि तेलंगाणातून गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे अनेक प्रकरणे उघ़ड झाली होती. मात्र, तेलंगाणातील रचकोंडा पोलिसांच्या (Rachakonda Police Ganja Seized) सतर्कतेमुळे अनेक गांजा तस्करांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच मागील चार वर्षात जवळपास 11 हजार किलो गांजा रचकोंडा पोलिसांनी विविध भागातून पकडला आहे. मराठमोळे आयपीएस अधिकारी आणि रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (Mahesh Bhagwat) यांच्या मार्गदर्शनाखाली गांजा तस्करांविरोधातील मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
सर्वात जास्ती गांजा महाराष्ट्रात जायचा - रचकोंडा पोलिसांनी 2018 पासून एकूण 10 हजार 567 किलो गांजा पकडला आहे. यात 6.5 लिटर द्रव गांजा, 4.154 मिली चरस, 6.1 ग्रॅम मेथाफेटा, 840 ग्रॅम हेरॉइन, 40 ग्रॅम सीओपीअम पोलिसांनी जप्त केले आहे. यातील सर्वात जास्ती गांजा हा महाराष्ट्रातील विविध भागात पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. तेलंगाणाला महाराष्ट्राची सीम लागून आहे. याचाच फायदा घेत तस्कर गांजाचा पुरवठा करतात. रचकोंडा पोलिसांनी मागील चार वर्षात 233 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच याप्रकरणांमध्ये 592 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, तर 88 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई - रचकोंडा पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. यात रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि यदाद्री भुवनगिरी या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात दोन टोल प्लाझांचाही समावेश आहे, जिथे आंध्र प्रदेश आणि ओडिशामधून गांजा महाराष्ट्र, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये नेला जातो. त्यामुळे हैदराबादच्या तीन आयुक्तालयांपैकी आमच्याकडे अधिक जबाबदारी आहे. तसेच आमचे पोलीस अधिकारीही सतर्क असतात. त्यामुळेच मागील चार वर्षात मोठ्या प्रमाणात गांजा पकडला असल्याची माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली आहे.