Race for Karnataka CM 2023 : पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, दिल्लीला जाणार नाही: डी के शिवकुमार यांची स्पष्टोक्ती
कर्नाटकात मुख्यमंत्री पदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडणार यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये राजकारण रंगले आहे. सिद्धरामय्या आज दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत. तर डीके शिवकुमार यांनीही पक्ष देईल ती भूमिका स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे.
संग्रहित छायाचित्र
By
Published : May 15, 2023, 11:59 AM IST
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या आज दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ डीके शिवकुमार हे देखील दिल्लीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र डीके शिवकुमार यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असून आपण दिल्लीला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत. आज दिल्लीला जाणार नसून काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल - डीके शिवकुमार
डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात स्पर्धा :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन सध्या काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे. निकालाचे कल स्पष्ट होताच सिद्धरामय्या यांच्या मुलाने माझ्या वडिलांना मुख्यमंत्री पदावर संधी मिळायला हवी, असे स्पष्ट केले आहे. कर्नाटकच्या विकासासाठी सिद्धरामय्या यांनाच कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान करायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
आज दिल्लीत घेणार काँग्रेस नेत्यांची भेट :कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री निवडीच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे नेते दिल्ली दरबारी पोहोचत आहेत. आज सिद्धरामय्या हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्यार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. त्यासह डीके शिवकुमार हे देखील आज राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र डीके शिवकुमार यांनी ती फेटाळली आहे.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार :कर्नाटकातील तगडे काँग्रेस नेते म्हणून डीके शिवकुमार यांची ओळख आहे. मात्र सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कर्नाटकात निवडणुका लढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे पारडे मुख्यमंत्री पदासाठी तगडे मानले जात आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाने कर्नाटकच्या मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष केले आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र डीके शिवकुमार यांनी आज आपण दिल्लीत जाणार नसून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले.