नवी दिल्ली :'क्वाड' राष्ट्र समूहातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे. या बैठकीत चार नेत्यांच्या संयुक्त निवेदनात दहशतवादविरोधी मुद्द्यावर चर्चा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 'आम्ही दहशतवादविरोधी क्वाड वर्किंग ग्रुपच्या स्थापनेची घोषणा करतो, जे दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसक अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी क्वाड आणि इंडो - पॅसिफिक भागीदारांमधील सहकार्य सुलभ करेल,' असे निवेदनात म्हटले आहे. दहशतवादविरोधी मुद्द्यावर आमची चर्चा सुरू ठेवण्यासाठी आम्ही 2023 मध्ये अमेरिकेत दहशतवादविरोधी क्वाड वर्किंग ग्रुपच्या पहिल्या बैठकीची वाट पाहत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.
एस जयशंकर बैठकीचे अध्यक्ष : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या बैठकीचे अध्यक्ष असतील. बैठकीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन उपस्थित राहणार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्कमधील बैठकीत झालेल्या चर्चेला या बैठकीत पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच बैठकीत इंडो - पॅसिफिक क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक मुद्द्यांवर देखील बैठकीत विचार विनिमय केल्या जाईल. विधायक अजेंडा शोधण्यासाठी विदेश मंत्री क्वाडच्या प्रगतीचा आढावा घेतील. परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत इंडो - पॅसिफिक क्षेत्रातील एकूण परिस्थितीवर चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीबाबत चर्चा होऊ शकते.