नवी दिल्ली Jaishankar Meets Families of 8 Indians : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. यासंगर्भात त्यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केलीय.
पोस्टमध्ये काय म्हणाले एस जयशंकर : पोस्टमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या 8 भारतीयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या लोकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. एस जयशंकर यांनी पुढं लिहिलं की, या बैठकीत भारत सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत आहे. याला प्राधान्य देण्यात आलंय. पीडितांच्या कुटुंबीयांचं दु:ख सरकारला समजतं, असंही त्यांनी लिहिलंय. तसंच नौदलातील अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी सर्व कुटुंबीयांना दिली.
कतारमधील न्यायालयानं सुनावली फाशिची शिक्षा : मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे 8 माजी अधिकारी ऑगस्ट 2022 पासून कतार तुरुंगात कैद आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप आहे. कतारमधील न्यायालयानं या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावलीय. कतारमधील आठ माजी नौदल अधिकाऱ्यांमध्ये कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला होता.