अमृतसर :प्रसिद्ध पंजाबी लोक गायक सुरिंदर शिंदा यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऑपरेशननंतर त्यांच्या शरीरात संसर्ग वाढल्याने त्यांचे बुधवारी (26 जुलै) त्यांचे निधन झाले. सुरिंदर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना अमृतसरमधील डीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायक शिंदा यांच्या जाण्याने पंजाबी मनोरंजन क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गायक शिंदा यांच्या पश्चात पत्नी जोगिंदर कौर आणि मुलगा मनिंदर शिंदा, मुलगी सिमरन शिंदा असा परिवार आहे.
सुरिंदर शिंदाचा यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथील आयली गावात झाला. त्यांचे आई-वडील (बचन राम आणि विदेवती) संगीताशी संबंधित असल्याने त्यांना संगीताचा बालपणापासूनच वारसा मिळाला. वयाच्या चौथ्या वर्षीपासून त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली.
शिंदा यांची अशी होती संगीतामधील कारकीर्दसुरिंदर यांचे मूळ नाव सुरिंदर पाल धम्मी होते. त्यांनी उस्ताद मिस्तारी बचन राम यांच्याकडून गायनाचे गुण शिकले. संगीतासोबतच शिंदाने आपले प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले होते. गायक होण्याआधी शिंदा यांनी लुधियानामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर म्हणूनही काम केले होते. पण, संगीतामधील आवडीमुळे त्यांनी नोकरी सोडून दिली होती.
26 सुवर्ण पदके आणि 2500 ट्रॉफीचे ठरले मानकरी-गायक त्याचबरोबर अभिनेता म्हणूनदेखील शिंदा यांनी उल्लेखनी काम केले. यामध्ये पुट जट्टा दे, उंच दार बेबे नानक दा, आँख जट्टा दी, जट्ट जिओना मौड, बदला जट्टी दा, पटोला या चित्रपटांचा समावेश आहे. गायन आणि अभिनयातील योगदानाबद्दल त्यांना 26 सुवर्ण पदके आणि 2500 ट्रॉफी मिळाली आहेत. लोकगायनातील त्यांच्या लोकप्रियतेची दखल घेत कला परिषदेने त्यांना पंजाबचा गौरवरत्न पुरस्कारही दिला आहे. याचबरोबर त्यांना यूकेमध्ये शिरोमणी गायक पुरस्कार आणि पंजाबी लोक पुरस्कार मिळाला आहे. शिंदा यांनी आजवर 165 गाण्यांच्या कॅसेट्स रिलीज केल्या आहेत. 'उच्छा बुर्ज लाहोर'हे शिंदांचे पहिलेच गाणे सुपरहिट ठरल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीचा आलेख उंचावत गेला. पंजाबी गाणे देशातील सर्वच राज्यात लोकप्रिय आहेत. त्यामुळे सुरिंदर यांच्या निधनानंतर संगीतप्रेमींमधून शोक व्यक्त होत आहे.