(चंदिगड) पंजाब - पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आप सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारवाईदेखील केली आहे. ही कारवाई त्यांनी थेट मंत्रिमंडळातीलच आरोग्य मंत्री विजय सिंगला यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यामुळे सिंगला यांना कॅबिनेट मंत्रिपदावरून हटवण्यात ( Bhagwant Mann removed Vijay Singla) आले आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आले आहे.
विजय सिंगला हे पंजाब सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचारात गुंतल्याचे भक्कम पुरावे सापडले आहेत. सिंगला हे ठेक्यांसाठी अधिकाऱ्यांकडून 1 टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप आहे. याबाबत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई झाली आहे. सिंगला यांना अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा -Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेखाली ही कारवाई झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सिंगला यांच्याविरोधात तक्रारी मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही कारवाई केली. एका मुख्यमंत्र्याने आपल्याच मंत्रिमंडळातील नेत्यावर कारवाई केल्याची ही देशातील दुसरी घटना आहे. 2015 साली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपल्याच मंत्र्याला पदावरून हटवले होते. या कारवाईनंतर एक टक्के भ्रष्टाचार देखील सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे. लोकांनी मोठ्या आशेने आप पक्षाला निवडून दिले आहे. आणि त्यांच्या अपेक्षांवर आम्हाला खरे उतरायचे आहे, असे भगवंत मान म्हणाले.