मुंबई : कॉम्रेड बलविंदर सिंग हत्या प्रकरणातील दुसऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पंजाब पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबई विमानतळावरुन हा आरोपी दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. इंद्रजीत सिंग असे या आरोपीचे नाव आहे. इंद्रजीतने आपला साथीदार गुरजीत सिंग यासोबत मिळून बलविंदर सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या केली होती.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरजीत सिंग याला दिल्ली पोलिसांनी ७ डिसेंबर २०२०ला अटक केली होती. त्याच्यासोबत सुखजीत सिंग यालाही अटक करण्यात आली होती. ज्यावेळी गुरजीत आणि इंद्रजीत हत्या करत होते, तेव्हा सुखजीत हा काही अंतरावर थांबला होता अशी माहिती पुढे चौकशीत समोर आली. तर, हत्येनंतर इंद्रजीत फरार झाला होता.
विदेशी खलिस्तानी कार्यकर्त्यांनी पुरवली मदत..
अटक करण्यात आल्यानंतर इंद्रजीतने पोलिसांना सांगितले, की दोन खलिस्तानी कार्यकर्त्यांनी मार्च २०२०मध्ये फेसबुकवरुन त्यांना संपर्क साधला होता. तसेच, त्यांनीच आपल्याला बलविंदर यांची हत्या करण्यास प्रोत्साहित केल्याचेही इंद्रजीतने सांगितले. सनी (रा. कॅनडा) या खलिस्तानी कार्यकर्त्यानेच आपल्याला सुख भिखारीवाल या दरोडेखोराशी संपर्क करुन दिल्याचेही इंद्रजीतने सांगितले. यासोबतच या सनी नावाच्या व्यक्तीने हत्येपूर्वी आणि हत्येनंतरही इंद्रजीत आणि त्याच्या साथीदारांना आर्थिक मदत केल्याचेही सांगितले.