मुंबई : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मिशन गुंतवणुकीसंदर्भात दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान भगवंत मान यांनी पंजाबमध्ये फिल्मसिटी बनवण्याची घोषणा केली आहे. भगवंत मान म्हणाले की, पॉलिवूड हा खूप मोठा उद्योग आहे. बॉलीवूडचे अनेक चित्रपट पंजाबमध्ये शूट केले जातात आणि अनेक बॉलिवूड चित्रपट पंजाबशी संबंधित कथांवर बनवले जातात. नजीकच्या काळात ते पॉलिवूड आणि बॉलीवूडचे विलीनीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून सरकारला महसूल मिळेल आणि स्थानिक कलाकारांनाही काम मिळेल.
मुंबईतील उद्योगपतींची भेट : यावेळी बोलताना भगवंत मान यांनी 'लाफ्टर चॅलेंज'चा उल्लेख केला. आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगून मुंबईशी आपल्या अनेक आठवणी जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'पंजाब सरकार राज्यात उद्योग उभारण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री भगवंत मान मुंबईतील उद्योगपतींची भेट घेतील आणि त्यांच्याशी पंजाबमधील गुंतवणूक आणि येथील सद्यस्थितीबाबत चर्चा करतील. या सोबतच त्यांना पंजाब सरकारच्या गुंतवणूक धोरणांची माहिती दिली जाईल. पंजाबच्या औद्योगिक क्षेत्राची उन्नती आणि पंजाबमध्ये गुंतवणूक करून नफा मिळविण्यासाठी व्यावसायिक कोणते प्लॅटफॉर्म वापरू शकतात यावरही चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री भगवंत मान एका कार्यक्रमात सहभागी होऊन व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, पंजाब सरकारच्या योजना आणि खुल्या गुंतवणुकीबाबत ते उद्योगपतींशी सविस्तर चर्चा करणार आहेत.