चंदीगड -आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारने शेतकऱ्यांना खूश केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांकरिता कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेमुळे पंजाबमधील 2.85 लाख शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांचे 590 कोटी रुपयांचे कर्जमाफ होणार आहे.
कर्जमाफी योजना ही मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी वर्गाचे कर्जमाफ करण्यात येत आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे (पीएसीएस) सदस्य असलेल्या 2,85,325 सदस्याचं 590 कोटींचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला सुमारे 20 हजार रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा-पाकिस्तानात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट, 9 चिनी नागरिकांसह 13 ठार
निवडणुकीत काँग्रेसने कर्जमाफीचे दिले होते आश्वासन-
कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना 20 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमात धनादेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 5.64 लाख शेतकऱ्यांचे 4624 कोटी रुपयांचे कर्जमाफ कऱण्यात आले आहे. पंजाब काँग्रेसने 2017 मधील विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच भाग म्हणून पंजाब सरकार कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करत आहे.