श्रीनगर Pulwama Attack : जम्मू - काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आज (३० ऑक्टोबर) दहशतवाद्यांनी एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश असं ठार झालेल्या मजुराचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
दहशतवाद्यांनी मजुराची हत्या केली : जम्मू - काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या नोपोरा येथील चुठी भागात दहशतवाद्यांनी या मजुराची हत्या केली. पोलिसांनी पुढे सांगितलं की, रुग्णालयात नेत असताना मजुराचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
पोलिसावर गोळ्या झाडल्या : या आधी रविवारी देखील दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळ्या झाडल्या होत्या. श्रीनगरमधील ईदगाहजवळ ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत सांगितलं की, जम्मू - काश्मीरचे कर्मचारी निरीक्षक मसरूर वाणी स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक काही लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आठ महिन्यांत २७ दहशतवादी मारले : सुरक्षा दलांनी रविवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जम्मू-काश्मीर पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील जुमागुंड सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलंय. तर दोनच दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) माछिल सेक्टरमध्ये पाच दहशतवादी मारले गेले होते. सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे केवळ आठ महिन्यांत एकट्या कुपवाडा जिल्ह्यात एकूण २७ दहशतवादी मारले गेले आहेत.
हेही वाचा :
- Heroin Drone Seized : पाकिस्तान सीमेवर ३५ कोटींची हेरॉईन जप्त, चीन निर्मित ड्रोनही सापडला