पुद्दुचेरी : कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता पुद्दुचेरी सरकारने संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली. दहा मेच्या मध्यरात्रीपासून पुढे १४ दिवसांसाठी हा लॉकडाऊन लागू असणार आहे.
पुद्दुचेरी सरकारने २७ एप्रिल ते तीन मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्बंधांनंतरही प्रदेशातील कोरोना परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे १० मे पासून कोरोना साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे, असे सरकारने जाहीर केलेल्या सूचनेत म्हटले आहे.
काय सुरू, काय बंद?
या लॉकडाऊनमध्ये सर्व बीच, पार्क, उद्याने बंद असतील. कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, खेळाचे, मनोरंजक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा यात्रेसंबंधी कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असणार आहे. या लॉकडाऊमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
यासोबतच प्रोव्हिजन स्टोर, भाज्यांची दुकाने, खाद्यपदार्थ, किराणा, मांस-मच्छी विक्री करणारे अशा दुकानांना दुपारी बारा वाजेपर्यंत विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांमध्ये एसी बंद ठेवणे अनिवार्य असणार आहे.
पुद्दुचेरीमध्ये शनिवारी १,७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १९ जणांचा मृत्यू झाला. सध्या शहरात १३,५८५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :रुग्णालयात दाखल होण्याकरता कोरोनाची चाचणी बंधनकारक नाही-आरोग्य मंत्रालय