वाराणसीPm Narendra Modi :संसदेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी, 23 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यासोबतच ते उत्तर प्रदेशमध्ये बांधलेल्या 16 अटल निवासी शाळांचं उद्घाटनही करतील. पंतप्रधान कार्यालयानं (PMO) दिलेल्या माहितीनुसार, रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे काशी संसद सांस्कृतिक महोत्सव 2023 च्या समारोप समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होतील.
स्टेडियम भगवान शिवांपासून प्रेरित :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात भादिव्य क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. वाराणसीतील गंजरी येथे 450 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. वाराणसीतील या स्टेडियममध्ये काशी संस्कृती पाहायला मिळणार आहे. गांजरी येथे उभारण्यात येणारे स्टेडियम अतिशय आकर्षक बनवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाराणसीला भगवान शिवाचं शहर म्हटलं जातं. त्यामुळं हे स्टेडियम शिवमय करण्याचा मानस असल्याचं बोललं जात आहे. वाराणसीतील गंजरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठीही जमीन संपादित करण्यात आली आहे. हे स्टेडियम 30.6 एकरवर बांधले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 30 हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल. या स्टेडियममध्ये सात खेळपट्ट्या असणार आहेत. स्टेडियममध्ये कॉमेंट्री बॉक्स, प्रेस गॅलरी अशा अनेक सुविधा असतील.
प्रस्तावित कार्यक्रमाची माहिती :पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये जिल्हा प्रशासनाला 23 सप्टेंबर रोजी प्रस्तावित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. पीएम मोदी 11:00 ते 12:00 दरम्यान पोहोचतील. ते 5 तास वाराणसीमध्ये राहतील, असं पीएमओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. येथे ते अटल निवासी शाळेत शिकणाऱ्या 40 मुलांशी संवाद साधतील. त्यानंतर ते संसद सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्यांची भेट घेतील. एक दिवस आधी म्हणजे बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात सामील होणारी वाहनेही वाराणसीला पोहोचली आहेत.
पायाभरणी समारंभात दिग्गज क्रिकेटपटूंचा सहभाग :आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभात बीसीसीआयचे अधिकारी जय शाह, राजीव शुक्ला यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, रॉजर बिन्नी, कपिल देव, गोपाल शर्मा, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, करसन घावरी, मदन लाल असे दिग्गज खेळाडूही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा पायाभरणी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी बीसीसीआयने मोठ्या क्रिकेटपटूंना निमंत्रण पाठवलं आहे.
हेही वाचा -
- ICC ODI World Cup 2023 Trophy : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीत क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी प्रदर्शित, पहा व्हिडिओ
- ICC World Cup Trophy : रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रदर्शित होणार आयसीसी विश्वचषक ट्रॉफी, जाणून घ्या ट्रॉफीबद्दल सर्वकाही
- IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव