पुलवामा : पुलवामा जिल्ह्यातील अचन गावात एका काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. त्यांनतर गावातील नागरिकांनी एकत्र येत अचन गावात घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच काश्मीर खोऱ्यात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याविरोधात घोषणाबाजी केली. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद थांबवला पाहिजे जेणेकरून सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्रपणे राहू शकतील अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. आचन गावातील स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन केले. यामध्ये गावातील ज्येष्ठांसह तरुणांनीही सहभाग घेतला. नागरिकांनी दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
काश्मिरी पंडित पलायान करणार नाही : पुलवामामध्ये स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांविरोधात केलेले आंदोलन पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. गावातील लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी या गावात एका काश्मिरी पंडिताची हत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. गावातील लोकांनी सांगितले की, येथे हिंदू, मुस्लिम एकत्र राहत आहेत. ते म्हणाले की, जरी काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातील इतर भागांतून स्थलांतर केले. मात्र, या गावातील काश्मिरी पंडित पलायन करणार नाहीत. गावातील सर्व नागरिक या संकटातून बाहेर पडण्यासाठी काश्मिरी पंडितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहे. काश्मिरी पंडित कोण्यात्याही परिस्थितीत गावातून पलायान करणार नाहीत. त्यांनी याच गावात राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.