आग्रा : आग्रा शहरातील एक राज्य कर अधिकारी हनी ट्रॅपला बळी पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. फेसबुकवर स्वत:ला गुप्त आयएएस सांगून एका तरुणीने राज्य कर अधिकाऱ्याशी मैत्री केली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर लवकरच प्रेमात झाले. आर्य समाज मंदिरात दोघांचा विवाह झाला. पीडित अधिकाऱ्याचा आरोप आहे की, त्यानंतर तरुणीने त्याच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ती त्याचे घर सोडून गेली. त्यानंतर अधिकाऱ्याला फसवणूक झाल्याचे समोर आले. पीडित अधिकाऱ्याचा आरोप आहे की, तरुणीने यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. राज्य कर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून, डीसीपी सिटी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी जगदीशपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फेसबुकवर मैत्री केली : राज्य कर अधिकारी मूळचे मैनपुरीचे रहिवासी आहेत. ते जयपूर हाऊस येथील कार्यालयात तैनात आहेत. फेसबुकवर तरुणीशी मैत्री केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तरुणीने त्यांना ती सुलतानपूरची रहिवासी असल्याचे सांगितले होते. तिने स्वत:ला अविवाहित आणि गुप्त आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. तसेच मी कोणत्या विभागात नियुक्त आहे हे सांगणार नाही, असे तिने सांगितले. यानंतर ते दोघे बोलू लागले.
तरुणीने अधिकाऱ्याकडून पैसे उकळले : कर अधिकाऱ्याने सांगितले की, एके दिवशी ती मुलगी मीटिंगसाठी बोलवलेल्या ठिकाणी पोहोचली नाही. भेटीसाठी दुसऱ्या ठिकाणी बोलावले. भेटीनंतर दोघांनी लग्नाला होकार दिला. लग्नासाठी 71,000 रुपयांची खरेदी केली. दोघांचेही आर्य समाज मंदिरात लग्न झाले. काही दिवस सोबत राहिल्यानंतर ती सुलतानपूरला गेली. तेथून ती विविध बहाणे करून पैशांची मागणी करू लागली. अधिकारी तिला सतत पैसे देत राहिले. नंतर कळले की तिचे आधीच लग्न झाले आहे. तिने लखनौमधील एका व्यक्तीशी लग्न केले होते, ज्याच्याविरुद्ध कोर्टात घटस्फोटाचा खटला सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यालाही फसवले : अधिकाऱ्याने तपास केला असता कळले की, मुलगी स्वत:ला मॅजिस्ट्रेट म्हणवून लोकांना भेटते. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ती त्यांच्याकडून पैसे उकळते. या तरुणीने एका पोलीस अधिकाऱ्यालाही प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप राज्य कर अधिकाऱ्याने केला आहे. आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळताच राज्य कर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या लोकांची यादी मोठी असू शकते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
- Job Fraud In Pune: भारतीय लष्करात नोकरी लावून देतो असे सांगत तरुणाची २८ लाख रुपयांची फसवणूक