न्युयॉर्क -राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. काल प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. दरम्यान, पंजाब हरयाणा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद जगात दिसून येत आहेत. अमेरिकेतील न्युयॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी शहरात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला होता.
मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी -
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेत खलिस्तानवाद्यांचे आंदोलन खलिस्तानी चळवळीचे झेंडे घेवून नागरिक न्युयॉर्क शहराच्या रस्त्यांवर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. वॉशिंग्टन डी. सी मधील भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी आंदोलन केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणांचा आणि कायद्यांचा आंदोलकांनी विरोध केला. केशरी रंगाचे खलिस्तानी झेंडे घवून काहींनी भारतविरोधी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना खलिस्तानी चळवळीचा पाठिंबा -
'हे भारतीय राज्यघटनेचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. प्रत्येक वर्षी आम्ही २६ जानेवारी हा काळा दिवस म्हणून साजरा करतो. मात्र, यावर्षी आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही फक्त शीख नाही तर देशातील सर्व धर्मियांना मानतो', असे नरेंद्र सिंह या आंदोलकाने सांगितले. यातील अनेक जण भारत विरोधी आंदोलनात कायम सहभागी असतात. एक महिन्यापूर्वी वॉशिंग्टन डी. सी मधील भारतीय दुतावासाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावला होता.