लखनौ -काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधींनी मोदींना जहाजाच्या कॅप्टनच्या रुपात दर्शवले आहे आणि देशातील स्थिती बिघडत असताना कॅप्टन जहाज सोडून पळून जात आहे. कॅप्टनच्या सीटची तुलना गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीशी केली आहे.
प्रियंका गांधींनी शेअर केलेली कहाणी -
फेसबुक पोस्टमध्ये प्रियंका गांधींनी लिहिले आहे, की कोणीतरी मला एक गोष्ट लिहून पाठवली होती. ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. एक जहाज वादळात अडकले होते. अनेक लोक सर्वांच्या डोळ्यादेखत वादळाने हिरावून नेले. अनेक लोक बुडण्याची शक्यता होती. जहाजामधील सर्व छोटे-मोठे कर्मचारी जहाजाला बुडण्यापासून वाचवण्यात गुंतले होते. खूपच भयानक स्थिती होती.
लोक एक दुसऱ्याला आधार देत होते. लोकांना वाटत होते की, जहाजाचा कॅप्टनही जहाला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असेल. जेव्हा स्थिती अधिकच बिघडली त्यावेळी लोकांनी जहाजाच्या कॅप्टनच्या धावा केल्या. मात्र सर्वजण निराश झाले. जेव्हा त्यांना कळाले की, त्यांचा कॅप्टन गायब आहे. लोकांचा आक्रोश होत असताना कॅप्टन आपल्या खुर्चीवरून उटून कोठेतरी गेला होता. जहाजात अडकलेले लोकही त्रस्त होते.
कॅप्टनचा आवाज तर त्यांना ऐकू येत होता मात्र काहीशा दूर अंतरावरून व वेगळा भासत होता. सर्वजण मदतकार्यात व्यस्त होते. अजूनही लोकांचे जीव वाचवायचे होते. कोणालाच काही कळले नाही की, कॅप्टन गपचूप येऊन आपल्या खुर्चीवर येऊन बसला होता.
कहाणीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने वारंवार टीका केली. कहाणीत जहाजामधील सुरक्षा कवच याचा उल्लेख यामुळे केला आहे, की कोरोनाच्या लसी परदेशी पाठवण्यात आल्या. प्रियंका गांधींनी ही कहाणी शेअर करत केंद्र सरकार व मोदींवर टीका केली आहे.