नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे टि्वटर खाते ब्लॉक करण्यात आले आहे. यावरून टि्वटर विरूद्ध काँग्रेस असे चित्र निर्माण झाले आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी टि्वटरवर आपले नाव बदलून राहुल गांधी असे केले आहे. तसेच त्यांनी प्रोफाईलमध्ये राहुल गांधी यांचा फोटो लावला आहे. यानंतर जवळपास सर्वच काँग्रेस नेत्यांनी टि्वटर आपले नाव बदलून राहुल गांधी केले आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी देखील आपल्या प्रोफाइलमध्ये राहुल गांधींचा फोटो लावला आहे. यावर टि्वटरकडून कोणत कारवाई करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुम्ही किती टि्वटर खाते बंद करणार? प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी यांचा आवाज बनून तुम्हाला प्रश्न करेल. आता मिळून या आंदोलनाचा भाग होऊया. अमेरिकेत टि्वटरने द्वेष पसरू नये. म्हणून माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते बंद केले होते. तर भारतात उलट होत आहे. सरकार करत असलेल्या अन्याय आणि द्वेषाविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. तर त्यांच्यावर टि्वटरकडून कारवाई करण्यात येत आहे, असे टि्वट युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी केले आहे.
काँग्रेसकडून सध्या #TwitterBJPseDarGaya हे हॅशटॅग चालवण्यात येत आहे. NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी टि्वट करून केंद्र सरकारवर टीका केली. सुर्य, चंद्र आणि सत्य कधीच बदलत नाहीत, असे ते म्हणाले. तर या प्रकारची डिजिटल दादागिरी चालणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.