नवी दिल्ली - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्त्यव्यानंतर सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेक महिला नेत्यांनाही या वक्तव्यावर टीका केली आहे. यातच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही टि्वट करून रावत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
प्रियांका गांधी यांनी टि्वटर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील नेत्यांचे गुडघे दिसत आहेत. यावरून प्रियांका यांनी टोला लगावला आहे. 'अरे देवा, त्यांचे तर गुडघे दिसत आहेत' असे कॅप्शनही प्रियंका यांनी फोटोला दिले आहे. प्रियांका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. यात त्यांनी संघाचा पोषाख (अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट) परिधान केलेला दिसत आहे. यात त्यांचे गुडघे दिसत आहेत. यावरून प्रियांका यांनी टीका केली.