गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वतीने प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी रविवार (आज) आसामच्या जोरहाटमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी आसामातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय प्रियंका गांधींनी नाझिरा आणि खुमताईमध्येही रॅलीला संबोधित करत विविध मुद्यांवर भाष्य केले.
आसाम सरकारवर टीका
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी दाखल झाल्या. यावेळी त्यांनी जोरहाट, नाझिरा आणि खुमताई येथे विविध निवडणूक प्रचार सभांना संबोधित केले. यावेळी बोलतांना गांधी म्हणाल्या की, 'आसाम सरकार आसाममधून नव्हे तर दिल्ली येथून चालविण्यात जात आहे. तर आसाममध्ये दोन मुख्यमंत्री असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. शिवाय "दिल्लीची परवानगी घेतल्याशिवाय आसाम सरकार काहीही करु शकत नाही. असा आरोपही यावेळी प्रियंका गांधी यांनी केला आहे.
भाजपाच्या 'त्या' आश्वासनावरुन केला प्रहार
२०१६ मध्ये आसाम निवडणुकीपूर्वी भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनावर बोलताना गांधी म्हणाल्या की, "आधीच्या निवडणुकीत भाजपाने बरीच आश्वासने दिली होती. २५ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. शिवाय आसाम करारातील सहा कलम अंमलात आणू. जे आसामी संस्कृतीचे रक्षण करेल.मात्र त्यांनी तसे केले नाही. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नसल्याचेही बोलले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी उलट काम केले. असा प्रहारही प्रियंका गांधी यांनी केला आहे.
चहा बाग क्षेत्रातील लोकांची भाजपाकडून फसवणूक
चहा बाग कामगारांना भाजपने काही खोटी आश्वासने दिली होती, असा गंभीर आरोप गांधी यांनी यावेळी केला आहे. सोबतच "चहा बाग कामगारांना भाजपने आश्वासन दिले होते की, त्यांची जीवनशैली उंचावण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. मात्र ज्या महिला मला भेटल्या त्यांनी मला सांगितले की, ' चहा बाग क्षेत्रातील आरोग्याच्या सोबतच त्यांच्या रोजच्या भाकरीसाठीही त्यांनी धडपड केली आहे. कारण सरकारने त्यांचे वेतन वाढविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाकडून खोटी आश्वासने देण्यात आल्याचेही यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले.
हेही वाचा-महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी व्हावी - अनुराग ठाकूर