बेंगळुरू :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस विमानाची सफर केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, या अनुभवाने देशाच्या स्वदेशी क्षमतेबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तसंच हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचं त्यांनी कौतुक केलं. तेजस या संपूर्ण स्वदेशी हलक्या लढावू विमानाच्या विकासातील या संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्याबद्दल त्यांनी या संस्थांचं अभिनंदन केलं.
हा अनुभव आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा होता, आमच्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता, आणि मला आमच्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना देऊन गेली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
एचएएलचे हार्दिक अभिनंदन -यावेळी पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात की, आज तेजसमध्ये उड्डाण करताना, मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, डीआरडीओ आणि एचएएलचे हार्दिक अभिनंदन. मोदी यांनी या तेजस सफरीबाबत काही फोटोही ट्विटरवर पोस्ट केले आहेत. पीएमओच्या हँडलवरही त्यांचे काही फोटो त्यांनी टाकले आहेत. उड्डाणापूर्वीची तयारी विमानात बसलेले हे फोटो आहेत.