नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आई हीराबेन मोदी यांचा उल्लेखही केला. देशात कोरोनाचा कहर असून अद्याप विषाणूचा धोका कमी झालेला नाही. कोरोना लसीसंदर्भात पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्या 100 वर्षीय आईने कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तुम्हीही लस घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना केले.
‘मन की बात’ कार्यक्रमाअंतर्गत मोदींनी मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील दुलारिया खेडय़ातील रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधला. त्यांना मार्गदर्शन केले आणि लस घेण्यास सांगितले. लसीबाबत कुठल्याही शंका बाळगण्याचे कारण नाही. लस अगदी सुरक्षीत आहे, असे मोदींनी त्यांना सांगितले. वैज्ञानिक व विज्ञान यावर विश्वास ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांना मोदींनी केले.
देशात 21 जून रोजी सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आता प्रौढांनाही मोफत लस दिली जात आहे. लस न घेण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. कोरोनाचा धोका आता टळला आहे, अशी धारणा झालेल्यांनी भ्रमातून बाहेर यावे. कारण, अद्याप कोरोनाचा धोका आहे. कोरोना रुप बदलत असून त्यात उत्परिवर्तने होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन आणि लस टोचवून घेऊन तुम्ही कोरोनाचा धोका टाळू शकता, असे मोदी म्हणाले.