नवी दिल्ली :मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला आहे. अविश्वास ठराव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भारताच्या विरोधी आघाडीवर (I.N.D.I.A.) जोरदार टीका केली. यूपीएपासून भारतापर्यंत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. मोदी हे नीरव मोदी म्हणून देशात राहत असल्याचे विधान त्यांनी केले. त्यामुळे भाजप खासदारांनी मोठा गोंधळ घातला. अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. अधीर रंजन यांनीही माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. मात्र, विरोधकांना चर्चा नको, गोंधळ हवा, अशी टीका केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.
मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले. देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मोदी म्हणाले. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले. देश आपल्याबरोबर असल्याचे मणिपूरवासियांना मोदींनी आश्वासन दिले. देशाच्या नागरिकांनी सरकारबद्दल कायम विश्वास दाखवला आहे. मी देवाचे आभार मानतो की, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची देवाने बुद्धी दिली. जनता आमच्या सरकारसोबत उभी आहे, असे देखील मोदींनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले आहे. विविध विधेयके आम्ही संसदेत पारित केली. आज मी जनतेचे आभार मानण्यासाठी संसेदत उभा आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.
विरोधकांना फक्त राजकारणात रस: विरोधकांच्या प्रस्तावावर तीन दिवसांपासून संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी गांभीर्याने सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला असता तर बरे झाले असते, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. यापूर्वी दोन्ही सभागृहांनी जनविश्वास विधेयक, वैद्यकीय विधेयक, ( Medical Bill ) दंत आयोग विधेयक ( Dental Commission Bill ), आदिवासी विधेयक, डिजिटल डेटा संरक्षण विधेयक ( Digital Data Protection Bill ) अशी अनेक महत्त्वाची विधेयके येथे मंजूर केली आहेत. केरळला सर्वाधिक फायदा होणारे मत्स्योत्पादनासाठीचे विधेयकही पारित केले ते विधेयकही विरोधकांनी गांभीर्याने घेतले नाही, अशी टीका मोदींनी केली.
विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला : तरुणांना नवी दिशा देणारी विधेयके संसदेत मांडण्यात आली. डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल ( Digital Data Protection Bill ) तंत्रज्ञानावर आधारित आहे. सर्व बिले, आदिवासी, दलित, गरीब, मागास नागरिकांसाठी होती. मात्र, विरोधकांनी यात रस दाखवला नाही. ज्या कामासाठी देशातील जनतेने त्यांना येथे पाठवले, त्या जनतेचाही विरोधकांनी विश्वासघात केला आहे. काही विरोधी पक्षांना, देशापेक्षा त्यांचा पक्ष अधिक महत्त्वाचा आहे, हे त्यांच्या वागण्याने सिद्ध झाले आहे. देशापुढे त्यांच्यासाठी पक्षाला प्राधान्य आहे. विरोधकांनी त्यांच्या वागण्यावरुन हे सिद्ध केले आहे की, त्यांना जनतेची चिंता नसून सत्तेची चिंता असल्याची टीका मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. देशापेक्षा विरोधकांना त्यांचा पक्ष मोठा वाटतो. देशात गरिबी आहे, मात्र विरोधकांना त्याबद्दल काहीच वाटत नसल्याची खंत देखील मोदींनी व्यक्त केली आहे.