नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी बाली येथे G20 गटातील नेत्यांशी जागतिक आर्थिक विकासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आरोग्य आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी विस्तृत चर्चा करतील. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बालीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले आहे, की ते जागतिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी भारताच्या उपलब्धी आणि "मजबूत वचनबद्धता" देखील अधोरेखित करतील. बाली शिखर परिषदेदरम्यान, जागतिक आर्थिक वाढ, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक चिंतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी G20 देशांच्या नेत्यांशी विस्तृत चर्चा करेन असही ते म्हणाले आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते इतर अनेक सहभागी देशांच्या नेत्यांना भेटतील आणि त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे. दरम्यान, जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदींची अनेक नेत्यांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठका होणार आहेत. परंतु, मोदी आणि जिनपिंग यांच्यात स्वतंत्र बैठक होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली तर, जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलाच समोरासमोर संवाद असेल. सप्टेंबरमध्ये समरकंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत दोघांची भेट झाली नाही.