टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान जवळपास 23 कार्यक्रमांना हजेरी लावणार असून अनेक मोठ्या सभाही घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते जपानच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा राजकीय आणि राजनैतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. यावेळी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत केले.
राजदूत अनिल त्रिगुनायत यांनी दिलेल्या माहितीवरुन, पंतप्रधानांची ही भेट सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इतर देशांसोबतची धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच या शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंधांमध्ये बहुआयामी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा आणि ईशान्येतील सहकार्यासह द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा करतील.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार -या शिखर परिषदेत तंत्रज्ञान, हवामान बदल, विकास आणि लस यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांशी परस्पर भागीदारी आणि संबंध मजबूत करण्याच्या योजनांवर चर्चा केली जाईल. याशिवाय वातावरणातील बदल आणि वाढत्या इंधनाच्या आव्हानाचा सामना कसा करायचा या मुद्द्यांवरही समिटमध्ये चर्चा होणार आहे. क्वाड देशांमध्ये तंत्रज्ञानाने विकास आणि प्रगतीच्या मार्गावर कशी प्रगती करता येईल, हाही चर्चेचा विषय ठरणार आहे. या चर्चेत जैवतंत्रज्ञानापासून सायबरसुरक्षापर्यंतच्या विषयांचा समावेश असेल. यासोबतच क्वाड देशांना हायटेक कसे करता येईल यावरही भर दिला जाणार आहे.