बेंगळुरू (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक दौर्यावर आहेत. कर्नाटकमध्ये त्यांचा एक विशाल रोड शो पार पडणार आहे. त्यानंतर ते विविध विकास कामांचे लोकार्पण करतील. कर्नाटक दौऱ्यात ते 16,000 कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. यात बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे आणि दुरूस्ती केलेले होसापेटे स्टेशनचे उद्घाटन यांचा समावेश आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हलचालींमध्ये वाढ : राष्ट्रीय महामार्ग 275 च्या 118 किलोमीटर लांबीच्या बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या सहा पदरी कामासाठी ८,४८० कोटी खर्च आला आहे. बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानच्या बहुप्रतिक्षित एक्स्प्रेस वेचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ट्विटमध्ये सांगितले. पंतप्रधानांचा हा दौरा दक्षिणेकडील राज्यात निवडणुकांच्या हलचाली वाढत असल्याचे एक चित्र आहे. कर्नाटकात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर काँग्रेस नेत्यांना आपली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्याचा विश्वास आहे.