नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करत बहिष्कार टाकला होता. तामिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक विधी पार पाडला. पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. धार्मिक विधीनंतर अधिनस्थ संतांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर मोदींनी नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित केला. त्यांनंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांनी केले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनातून प्रथम देशाल संबोधित केले.
60 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार : नवीन संसद भवना इमारतीच्या बांधकामामुळे 60 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केले. ते आज नवीन संसद भवानाच्या उद्घाटन प्रसंगी नवी दल्लीत बोलत होते.
'ही इमारत आधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. यामुळे 60,000 हून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी आम्ही डिजिटल गॅलरी तयार केली आहे.' -पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींनी केले 9 वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर : यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या नऊ वर्षांच्या सरकारचे रिपोर्ट कार्डही सादर केले. ते म्हणाले की, एखाद्या तज्ज्ञाने गेल्या नऊ वर्षांचे मूल्यमापन केले तर, ही नऊ वर्षे भारतातील नवनिर्माणाची असल्याचे लक्षात येईल. गरिबांचे कल्याण झाले आहे. आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आम्हाला अभिमान वाटतो. गेल्या नऊ वर्षांत बांधलेल्या 11 कोटी स्वच्छतागृहांमुळेही मी समाधानी आहे. ज्यांनी महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण केल्याने नागरिंकांची मान उंचावली आहे. आज जेव्हा आपण सुविधांबद्दल बोलतो, तेव्हा गेल्या नऊ वर्षांत गावांना जोडण्यासाठी चार लाख किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले. आज इको फ्रेंडली इमारत पाहून आनंद होत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आम्ही ५० हजारांहून अधिक अमृत सरोवर बांधले आहेत. आज आपण नवीन संसद भवन बांधल्याचा आनंद साजरा करत असताना देशात ३० हजाराहून अधिक नवीन ग्रामपंचायती बांधल्या आहेत. म्हणजेच पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत आमची निष्ठा एकच आहे. आमची प्रेरणा तीच आहे. देशाचा विकास, देशातील जनतेचा विकास असे मोदी म्हणाले.
लोकशाही आपला संस्कार : लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आपली संस्कृती आहे. भारत हा केवळ लोकशाही असणारा जगातील सर्वात मोठा देश नसुन तो लोकशाहीचा जनक देखील असल्याचे मोदी म्हणाले. तसेच भारत जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हा आपला 'संस्कार', विचार परंपरा आहे त्यामुळे देशात विविधता असुनही एकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
विविधतेचा नव्या संसद भवनात समावेश : संसदेची नवीन इमारत पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. संसदेची नवी इमारत या प्रयत्नांचे जिवंत प्रतीक बनली आहे. आज नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्य आहे. यामध्ये संस्कृती आहे तसेच संविधानाचा आवाज आहे. लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारलेला दिसतो. राज्यसभेचा भाग हा राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे. राष्ट्रीय वृक्ष वड देखील संसदेच्या प्रांगणात आहे. आपल्या देशाच्या विविध भागांतील विविधतेचा या नव्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे.
संविधान आमचा संकल्प :आमचे संविधान हाच आमचा संकल्प असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी बोलतांना म्हणाले. जो थांबतो, त्याचे नशीबही थांबते. जो चालत राहतो, त्याचे नशीबही चालत असते. म्हणूनच प्रयत्न चालू ठेवायला हवे. गुलामगिरीनंतर आपल्या भारताने खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरू केला. तो प्रवास अनेक चढउतारांवरून, अनेक आव्हानांवर मात करत आज देशाने स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात प्रवेश केला आहे.
पवित्र सेंगोलची स्थापना : चोल साम्राज्यात सेंगोलचे प्रतीक होते, चोल साम्राज्यात या सेंगोलला कर्तव्य मार्ग, सेवा मार्ग, राष्ट्रीय मार्गाचे प्रतीक मानले जात होते. राजांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक त्यावेळी बनले होते. तामिळनाडूहून खास आलेले महंत द्रष्टे आज सकाळी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी संसदेत उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती मोदी यांनी नविन संसदेत भाषण करतांना दिली. नवे विक्रम नव्या वाटांवर चालल्यानेच निर्माण होतात. मोदी नवीन विक्रम हे नवीन मार्गांवर चालल्यानेच निर्माण होतात. नवा भारत नवीन उद्दिष्टे ठरवत आहे. देशात नवा उत्साह आहे, नवा प्रवाह आहे. नवा विचार, नवी दिशा, नवी दृष्टी. संकल्प नवीन आहे, विश्वास नवीन असल्याचे मोदीं यांनी म्हटले आहे.
नवी संसद लोकशाहीचे मंदिर : काही क्षण इतिहासात अजरामर होतात : देशाच्या इतिहासात काही क्षण असे येतात, जे कायमचे अमर होतात. काही तारखा काळाच्या पुढ्यात इतिहासाची अमिट साक्ष बनतात. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळीच संसदेच्या संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या निर्धाराचा संदेश देणारे हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. तसेच पंतप्रधानांनी टपाल तिकीट, 75 रुपयांचे नाणे जारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय टपाल विभागाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. यानंतर त्यांनी भारतीय वित्त विभागाने तयार केलेले 75 रुपयांचे नाणे जारी केले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला देश साक्षीदार : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी संपूर्ण देश या क्षणाचा साक्षीदार आहे. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन संसद 2.5 वर्षात बांधली गेली. नवीन वातावरणात नवीन संकल्पना निर्माण होतील, असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्त केला आहे. ही वास्तू ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, हरित पर्यावरण, कला संस्कृती, स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. या इमारतीत प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.