नवी दिल्ली :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना तसेच देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांनाही सदिच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्याला गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य मिळाले आहे.
काय म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद -
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, उच्च शैक्षणिक संस्थांपासून ते सशस्त्र दलांपर्यंत, प्रयोगशाळांपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत, आमच्या मुली आपला ठसा उमटवत आहेत. आमच्या मुलींच्या या यशात मला भविष्यातील विकसित भारताची झलक दिसते. मी प्रत्येक पालकाला विनंती करतो की अशा प्रेरणादायी मुलींच्या कुटुंबांकडून शिका आणि त्यांच्या मुलींना प्रगतीचे मार्ग शोधण्यासाठी संधी द्या, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. कोरोना महामारीचा संदर्भ देत ते म्हणाले की कोरोना साथीची तीव्रता कमी झाली आहे पण कोरोना विषाणूचा प्रभाव अजून संपलेला नाही. सर्व जोखीम घेत, कोरोनाची दुसरी लाट आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रित केली जात आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी अल्पावधीत कोरोनाची लस तयार केली. तर यादरम्यान काही कोरोना योद्धे हे शहीद झाले त्यांच्या परिवारांच्या दुःखात संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. अभूतपूर्व संकटाच्या या टप्प्यात अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकले नाहीत आणि अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला याचे मला खूप वाईट वाटते, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
आता जेव्हा आपण आपल्या प्रजासत्ताकाच्या 75 वर्षांच्या प्रवासाकडे वळून पाहतो, तेव्हा आपण प्रवास केलेल्या लक्षणीय काळाचा अभिमान बाळगण्याचे अनेक क्षण सापडतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी आपल्याला शिकवलंय की चुकीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकण्यापेक्षा योग्य दिशेने संथ आणि स्थिर पावले टाकणं कधीही श्रेयस्कर असते.
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये, आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या गेल्या 121 वर्षांमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा -75वा स्वातंत्र्यदिवस : देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवचेतनाचा संचार होवो; पंतप्रधानांकडून शुभेच्छा!