कोलकाता (पश्चिम बंगाल) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आज सोमवार (दि. 27 मार्च) येथे रवाना झाल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि राज्यमंत्री फरहाद हकीम आणि सुजित बोस यांनी मुर्मू यांचे स्वागत केले. संरक्षण दलाने त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. राष्ट्रपती झाल्यानंतर मुर्मू प्रथमच या राज्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
आयोजित एका कार्यक्रमात मुर्मू यांचा सन्मान : विमानतळावरून त्या रॉयल कलकत्ता टर्फ क्लबच्या मैदानावर हेलिकॉप्टर घेऊन दाखल झाल्या आहेत. त्यानंतर रस्त्याने राजभवनापर्यंत गेल्या. या दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्मू यांचे स्वागत केले. कोलकात्याच्या दक्षिणेकडील सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थान असलेल्या नेताजी भवनाला देणार असून त्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर, त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या मध्य कोलकाता येथील जोरसांको ठाकूरबारी येथील निवासस्थानी जाऊन कवी टागोरांना श्रद्धांजली अर्पण करतील. पश्चिम बंगाल सरकारतर्फे नेताजी इनडोअर स्टेडियमवर आयोजित एका कार्यक्रमात मुर्मू यांचा सन्मान करण्यात येणार असून, तेथे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.