नवी दिल्ली - चीनसोबतच्या सीमावादात भारतीय नौदलाने लडाख भागात P-8I लढाऊ विमाने तैनात केली आहेत. कोरोना आणि चिनी संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी म्हटले आहे. नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन्ही आघाड्यांवर लढण्यास नौदल सज्ज
चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी नौदल विभाग हवाई दल आणि लष्कराशी समन्वय साधून काम करत आहे. चिनी जहाजांनी संशोधन किंवा इतर कारणांसाठी हिंदी महासागरात भारतीय हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांचा कसा मुकाबला करायचा याची नियमावली ठरलेली आहे. सीमेवर चीनने जैसे ते स्थिती बदण्याचा प्रयत्न केला. त्यातच देशात कोरोनाचाही प्रसार झाला आहे. अशा परिस्थितीतही नौदल चीनचा सामना करण्यास सज्ज असल्याचे करमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
हिंदी महासागरात नौदलाचा दरारा
यावर्षी एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. अजूनही हा वाद निवळला नाही. चीनसोबत सीमावाद सुरू झाल्यानंतर लष्कराची तीन्ही दले सतर्क झाली आहेत. हिंदी महासागरात भारतीय नौदलाने कळीची भूमिका निभावत चीनवर दरारा निर्माण केल्याचे व्हाईस अॅडमीरल ए. के. चावला यांनी काल (गुरुवार) सांगितले.
व्हाईस अॅडमिरल ए. के चावला हे नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग कमांडींग चिफ ऑफिसर आहेत. चिनी लष्कराने हिंदी महासागरात कोणताही आगळीक करू नये यासाठी भारतीय नौदलाने आपला दरारा निर्माण केला आहे. त्यामुळे चीनने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही, असे चावला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जमिनीवर आणि समुद्रातही भारताशी वाद केल्याचे गंभीर परिणाम होतील, असा संदेश चीनपर्यंत गेल्याचे ते म्हणाले.