नवी दिल्ली -हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात, असा सवाल करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हुकूमशहा असा उल्लेख केला. यावर भारतीय जनता पार्टीने (भाजपा) पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टि्वट करत 'एम' ने सुरवात होणारे 'मोहनदास' हेही नाव आहे, असे टि्वट केले.
साबरमतीचे संत बापू यांचे नाव ही 'एम' ने 'मोहनदास' असे आहे. सत्य आणि अहिंसेचा सर्वात मोठे पुरस्कर्तेरस्कर्ते ते होते. तसेच भारताच्या मातीची गोष्टच वेगळी आहे. ही हुकूमशहांची नाही. तर बौद्ध आणि महावीर यांची माती आहे. मात्र, तुम्हाला हे समजणार नाही, असो...', अशा शब्दात प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवर टिकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांच्या टि्वटवर हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनीही प्रतिक्रिया दिली होती. सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने सुरू होतात, असे टि्वट अपरिपक्व असलेल्या राहुल गांधींनी केले आहे. मोहनदास करमचंद गांधी अहिंसेचे पुजारी होते. जे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव देखील 'एम' शब्दापासून सुरू होते. त्यांच्याबद्दल राहुल गांधींचे काय मत आहे?, असा सवाल अनिल वीज यांनी केला आहे. त्याचबरोबर ट्विटर युजर्संनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर विविध टिप्पण्या केल्या आहेत. मनमोहन सिंग आणि मोतीलाल नेहरू यांचेही नाव 'एम' पासून सुरू होते, असे एका युजरने लिहिले आहे.
काय प्रकरण ?
राहुल गांधी यांनी टि्वट करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्रम मोदींचा हुकूमशाह असा उल्लेख केला होता. सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात?, असा सवाल त्यांनी टि्वट केला. तसेच त्यांनी काही 'एम' ने सुरू होणाऱ्या हुकूमशहांची नावे जाहीर केली. यात एफ. मार्कोस (फिलीपाईन्स), बी. मुसोलिनी (इटली), एस. मिलोसेविक (सर्बिया), हुस्नी मुबारक (मिस्र), मोबुतू (कांगो), मिशेल मिकोमबेरो (बुरुंडी), परवेज मुशर्रफ (पाकिस्तान) या हुकूमशहाची नावे आहेत.