नवी दिल्ली - कोरोनाबाधितांना आरोग्य सेवा तातडीने मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णालयात दाखल होण्याकरिता कोरोनाबाधित असलेल्या रिपोर्टची यापुढे गरज लागणार नाही. एवढेच नव्हे तर कोणेतही वैध ओळखपत्र नसतानाही रुग्णालयात रुग्णांना दाखल होता येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी असलेल्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. त्यामुळे खासगी असो किंवा सरकारी रुग्णालय हे ऑक्सिजन, जीवनावश्यक औषधे किंवा सेवा देणे कोणत्याही रुग्णाला टाळू शकणार नाहीत. याबाबतचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
हेही वाचा-डीआरडीओकडून कोरोनाच्या लढ्याकरिता औषध विकसित; डीजीसीआयकडून मंजुरी
काय म्हटले आहे आरोग्य मंत्रालयाने?
- कोरोनाबाधित रुग्णाला त्वरित, प्रभावी आणि व्यापक सेवा देण्यासाठी रुग्णकेंद्रित सुधारणा करण्यात आल्याचा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
- संशियत कोरोनाबाधिताला कोविड केअर सेंटरमधील (CCC) संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये दाखल करावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
- हे निर्देश कोविड आरोग्य सेंटर (DCHC) व कोविड रुग्णालय (DHC) यांनाही लागू आहेत.
- जरी रुग्णाकडे कोणतेही वैध ओळखपत्र नसेल व दुसऱ्या शहरामधील असला तरी या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल करणे टाळता येणार नाही.