नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घातल्यानंतर आता त्याच्या योजनांचा खुलासा होत आहे. कर्नाटकमधील भाजप युवा मोर्चाच्या सदस्याच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हा खुलासा केला आहे. या आरोपपत्रात पीएफआयला 2047 पर्यंत भारतात इस्लामिक शासन स्थापन करायचे होते, असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी 'सर्व्हिस टीम' आणि 'किलर स्क्वाड'ही तयार केली होती.
इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचा अजेंडा : समाजात दहशतवाद, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याच्या आणि 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या आपल्या अजेंडाचा एक भाग म्हणून, PFI ने 'सर्व्हिस टीम' किंवा 'किलर स्क्वाड' नावाच्या गुप्त संघांची स्थापना केली होती. गेल्या वर्षी 26 जुलैला दक्षिण कर्नाटकातील सुलिया तालुक्यातील बेलारे गावात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा समिती सदस्य प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी एनआयएने शुक्रवारी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यामध्ये हे खुलासे करण्यात आले आहेत.
20 पीएफआय सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल : एका विशिष्ट समुदायाच्या सदस्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नेत्तारू यांना प्राणघातक शस्त्रांनी सार्वजनिकरित्या मारण्यात आले होते. 20 पीएफआय सदस्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या 'सर्व्हिस टीम' सदस्यांना पीएफआयच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार ओळखल्या गेलेल्या लक्ष्यांवर हल्ले आणि मारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आरोपपत्रात म्हटले आहे की पीएफआय सदस्य आणि त्यांच्या नेत्यांनी बेंगळुरू शहरातील सुलिया टाउन आणि बेल्लारे गावात बैठका घेतल्या. यामध्ये सदस्यांना विशिष्ट समुदायातील प्रमुख सदस्यांना ओळखून त्यांना लक्ष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.