नवी दिल्ली- रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा या उपस्थित होत्या.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची आज भेट घेतली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतली. आगामी पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर हे काँग्रेससाठी काम करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी काम केले होते.
हेही वाचा-सीरम स्पूटनिकचे सप्टेंबरमध्ये करणार उत्पादन; पुण्यात तयार होणारी ठरणार तिसरी लस
प्रशांत किशोर यांनी जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईला दोनवेळा भेट घेतली होती. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा-रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची घेतली भेट
दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर स्वतः प्रशांत किशोर यांनी कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत पडणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी स्वतःहून ते क्षेत्र सोडल्याचे सांगितले होते.
पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू-
कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकटदेखील आले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात पंजाब काँग्रेस सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलह वाढू लागले आहेत. त्यातून पंजाब काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दिल्लीला बोलावले आहेत. कॅप्टनदेखील आपल्या पातळीवर वाद मिटविण्याचा आणि संतप्त नेत्यांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंजाबमधील राजकीय समीकरण -
पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळे पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.