नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. तसचे जसजश्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय हिसांचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. यामध्ये गुप्तचर संघटनेने दिलेल्या अहवालात पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने येथील नेत्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये गेल्या २ आठवड्यात तब्बल ३३ व्हीआयपी नेत्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांचाही समावेश आहे.
राय यांना झेड सुरक्षा-
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नित्यानंद राय यांना निवडणुकीच्या प्रचारकाळात त्याच्या सुरक्षेसाठी 8 ते10 सीआरपीएफचे जवान तैनात राहतील. त्याच बरोबर इतर राज्यातही त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्राप्त यादीमध्ये नित्यानंद राय यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजपने त्यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले आहे.