पणजी -गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचाराच्या तोफा आता थंडावत आहेत. मात्र, यंदाची निवडणूक ही आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. याचे कारण या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्थिरता असल्याने कोण बाजी मारणार याबाबत अस्पष्टता आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने यंदाची निवडणूक ही सर्व गणिते वेगळी ठरवणारी आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी (Goa Election 2022 voting) व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळेल.
पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तरी सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन राज्यातील निवडणुकांकडे लागून राहिले आहे. याचे कारण उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालावर आगामी निवडणुकांच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. तर गोव्यातील निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रभाव असणार आहे. गोव्यातील निवडणूक ही नेहमीच अटीतटीची होते. गोव्यात काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा गोवा विधानसभा निवडणुकीतील सगळी गणिते बिघडलेली आहेत. कारण, भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर आणि तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी गोव्यात केलेली जोरदार प्रचार मोहीम. त्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळते की भाजपाला यापेक्षा या अन्य पक्षांच्या कामगिरीमुळे नवीन समीकरणे उदयास येणार आहेत, म्हणूनच यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांची गणित बिघडवणारी ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
- काँग्रेसपुढे अडचणी -
गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या जवळ जाऊनही सत्ता हस्तगत न करता येणाऱ्या काँग्रेससमोर यंदा अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते भाजपाच्या तंबूत दाखल झाले. यामुळे काँग्रेसला दुसऱ्या फळीतील ३८ नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी द्यावी लागली. इतकंच काय पक्षांतराच्या भीतीने धास्तावलेल्या काँग्रेसला उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावी लागली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या दौऱ्यानंतर नवसंजीवनी प्राप्त झालेल्या काँग्रेसला आपला मतदार आपल्या सोबत आहे की नाही याची तितकीशी खात्री राहिलेली नाही. नवीन उमेदवार किती करिष्मा करू शकतील याबाबतही साशंकता असल्याचे राजकीय विश्लेषक अनिल लाड सांगतात.
- भाजपामध्ये नाराजांची फौज