हैदराबाद - अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा पोलीस सातत्याने तपास करत आहेत. पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत. पीडितेचा जबाब पुन्हा घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदाराच्या मुलाच्या सहभागावर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्याला अटकही होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्याती तिघे अल्पवयीन आहेत.
दरम्यान, राज्य महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. आयोगाने डीजीपींकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फॉरेन्सिक पथकाला कारमधूनही काही पुरावेही मिळाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा तपास बंजारा हिल्सचे सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन हे करत आहेत. रविवारी संध्याकाळी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने इनोव्हा आणि बेंझची कसून तपासणी केली. अहवालानुसार, बेंझ कारमध्ये पीडितेचे काही साहित्य सापडले असून त्यात कर्णफुल, बुट आणि केसांचा समावेश आहे. मात्र, तपासणीत सापडलेल्या पुराव्यांबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.