नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी तरुण धमकी देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उच्च शिक्षित असलेल्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाच्या मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती आढळून आल्याने पोलीस जवानही चक्रावून गेले आहेत. या तरुणाच्या जवळून काही मदरशाबाबतची माहिती मिळून आली असून बिल बुकही आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुटुंबीयांनी तरुणाला काढले घराबाहेर :संशयित तरुण जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे तीन नागरिकांनी केली होती. यानंतर पोलिसांनी या संशयित तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तरुणाच्या ताब्यातून अनेक खळबळजनक साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी दिली आहे. या तरुणाला त्याच्या कुटूंबीयांनी घराबाहेर काढले होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उच्च शिक्षित तरुणाच्या मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती :दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या तरुणाच्या मोबाईलमधून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. हा तरुण बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचा पदवीधर आहे. मात्र त्याच्या वर्तनावरुन त्याच्या कुटूंबीयांनी त्याला घराबाहेर काढले आहे. या तरुणाने त्याची नोकरीही सोडल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी दिली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा तपास केला असता, अनेक खळबळजनक माहिती त्याच्या मोबाईलमधून उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी वृत्तसंस्थेला दिली.
अनेक मदरसा संचालकांच्या संपर्कात होता तरुण :पोलिसांनी पकडलेल्या तरुणाकडून अनेक मदरशाची माहिती असलेले पोस्टर्स मिळून आले आहेत. हा तरुण अनेक मदरसा संचालकांच्या संपर्कात होता. त्याच्याजवळून निधी घेण्याचे पावती पुस्तकही आढळून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी दिली आहे. या संशयित तरुणाला पोलिसांनी पकडून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत त्याने कोणाचे जबरदस्तीने धर्मांतरण केले, याबाबतची माहिती पोलीस तपासात उघड होईल, असेही पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी यावेळी वृत्तसंस्थेला दिली आहे.