नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये ही लस त्यांनी घेतली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. सिस्टर पी. निवेदा यांनी त्यांना ही लस दिली. याबाबतची माहिती स्वत: नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून पंतप्रधान मोदींनी सकाळी एम्स गाठले. लसीकरणानंतर अर्धा तास थांबून त्यांनी संपूर्ण प्रोटोकॉलचे अनुसरण केले.
पंतप्रधान मोदींना लस टोचवली लस टोचवून घेतल्यानंतर पंतप्रधान काय म्हणाले, याबाबत परिचारिका पी निवेदा यांनी सांगितले. '“लगा भी दी, पता भी नहीं चला” (कळालेच नाही. कधी लस टोचवली), असे ते म्हणाल्याचे परिचारिका पी निवेदा यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींना लस टोचवणारी परिचारिका पुदुद्चेरीमधील आहे. त्यांचे नाव पी नेवदा असे आहे. तर दुसरी परिचारिका ही केरळमधील असून त्यांचे नाव रोसम्मा अनिल आहे.
विशेष म्हणजे, मोदींनी भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली आहे. यावेळी त्यांच्या गळ्यात उपरणं पाहायला मिळाले. हे आसामी उपरणं आहे. या आसामी उपरण्याला स्थानिक 'गमुसा' असं म्हणतात. हे उपरणं देशातील वेगवेगळ्या भागात लोकप्रिय आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 15 हजार 510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 11 हजार 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 7 लाख 86 हजार 457 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1 लाख 57 हजार 157 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 68 हजार 627 आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 1 हजार 266 जणांना लस टोचवण्यात आली आहे.