नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन सलग आठव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, रतीय सैन्य दलाचे दोन एमआय-17 हेलिकॉप्टर अमृत आकारात पुष्प वृष्टी करतील. नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रमांवर जोर देण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.
सकाळी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे औपचारिक स्वागत करतील. त्यानंतर, संरक्षण सचिव पंतप्रधानांना दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, एव्हीएसएम यांचा परिचय करुन देतील. त्यानंतर, जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना सलामी तळाकडे घेऊन जातील. या ठिकाणी तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि दिल्ली पोलिस गार्ड पंतप्रधानांना सलामी देतील. यानंतर, पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील. पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात, लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिस यांचा प्रत्येकी एक अधिकारी आणि 20 जवान या पथकात आहेत.